लग्नाला परवानगी, मग गोंधळाला का नाही?

आर्थिक मदतीची मागणी


पंढरपूर. प्रतिनिधी : शासन काही अटी घालून लग्नाला परवानगी देते मग लग्नानंतर घालण्यात येणाऱ्या गोंधळाला का परवानगी देत नाही असा सवाल गोंधळी संघटनेचे अध्यक्ष कालिदास सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. 
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने विविध कार्यक्रमावर निर्बंध घातले आहे आहेत. अनलॉक सुरु झाल्यापासून काही बंधने हटविण्यात येत असली तरी सार्वजनिक ठरत असलेल्या अनेक कार्यक्रमाना आजही परवानगी दिलेली नाही. लग्नसोहळा तसेच अंत्यसंस्कारालाही गर्दीच्या मर्यादेची अट घातलेली आहे. सभा, करमणुकीचे कार्यक्रम अशा ठिकाणी गर्दी होत असते त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात येत नाही परंतु यामुळे लोककलावंत अडचणीत आलेले असून त्यांचे आर्थिक गणित पूर्ण कोलमडून गेलेले आहे. याच पार्श्वभूमीवर  सोमवारी पंढरीत एक पत्रकार परिषद घेऊन लोककलावंतांनी आपली व्यथा मांडली. 
     कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील चार महिन्यापासून तमाशा कलावंतांना आपल्या कलेपासून दूर  आहे, कला हेच उपजीविकेचे साधन असताना आणि कला सादर करता येत नसल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कलावंतांना आता शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र संगीत पार्टीचे अध्यक्ष अरुण मुसळे यांनी या पत्रकार परिषदेत केली. लॉकडॉऊनमुळे अडचणीत असलेल्या कलावंतांना आज आर्थिक मदतीची नितांत गरज आहे, शिवाय वृद्ध कलावंतांनाही मानधन देण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली. 
     शासनाने लग्नसोहळ्याला ५० व्यक्तींची मर्यादा घालून परवानगी दिली आहे पण लग्नानंतर केल्या जात असलेल्या गोंधळाच्या कार्यक्रमाला परवानगी नाही. गोंधळ हा धार्मिक कार्यक्रम आहे त्यामुळे 'शारीरिक अंतर तसेच मर्यादित व्यक्तींची मर्यादा घालून परवानगी दिली जावी अशी मागणी यावेळी गोंधळी संघटनेचे अध्यक्ष कालिदास सोनवणे यांनी केली. या पत्रकार परिषदेस राजश्री मुसळे, चंदा काळे, उज्ज्वला काळे, उषा काळे, सुरेखा  काळे आदी उपस्थित होते.  
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई