सर्वोत्कृष्ठ गणेश मंडळांना मिळणार शासनाचा पुरस्कार : पोलीसांना विशेष अधिकार

  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्काराबाबत जिल्हास्तरीय समिती

उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे अध्यक्षांसह  इतर चार सदस्यीय समितीची नियुक्ती 

 

सोलापूर: गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराबाबत निवड करण्यासाठी कार्यपध्दत निश्चित करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समिती स्थापन केली आहे.

ही समिती स्पर्धेमध्ये सहभागी गणेशोत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीमध्ये उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे अध्यक्ष असतील. इतर शासकीय/शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्राचार्या प्रतिभा धोत्रे, कला व्यवसाय केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, पोलीस अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक आनंद काजुळकर हे सदस्य म्हणून काम पाहतील. समिती व्हीडिओ व आवश्यक कागदपत्रे गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करून घेईल. प्रत्येक मंडळांना भेटी देऊन तक्त्यानुसार गुणांकन करून एका गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्य स्तरावर पाठवतील.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.

खालील निकषाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. गुणांकनासाठी बाबी पुढीलप्रमाणे- पर्यावरणपूरक मुर्ती -१० गुण,पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल / प्लॅस्टिक इ. साहित्य विरहीत)-१५ गुण, ध्वनी प्रदूषण रहित वातावरण -५ गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन, सामाजिक सलोखा इ. समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट- २० गुण, स्वातंत्र्य चळवळी संदर्भातील देखावा / सजावट- 25 गुण, रक्तदान शिबीर, वैद्यकिय सेवा शिबीर इ. कार्य- 10 गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी / विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक / आरोग्य / सामाजिक इ. बाबत केलेले कार्य -१० गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक / आरोग्य / सामाजिक इ. बाबत केलेले कार्य- 10 गुण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धा-10 गुण, पारंपरिक / देशी खेळाच्या स्पर्धा-10गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा (पाणी / प्रसाधन गृहे, वैद्यकिय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतूकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त इ. (प्रत्येक सुविधेस ५ गुण-25गुण, असे एकूण-१५० गुण असणार आहेत. 


पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास 2 सप्टेंबरपर्यंत                                           मुदतवाढ


सोलापूर  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सांस्कृतिक कार्य विभागाने यावर्षी गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवड करण्याची कार्यपध्दत निश्चित केली आहे.गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 ऑगस्ट 2022 दिली होती, स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 2 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक शासनाने जाहीर केले आहे.


स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सदर अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या

ईमेलवर 2 सप्टेंबर 2022 पूर्वी ऑनलाईन पाठवावेत. प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई यांनी सदर अर्जाची जिल्हानिहाय विभागणी करुन संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या ईमेलवर दि. 3 सप्टेंबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज उपलब्ध करुन द्यावेत. यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र ईमेल तयार करुन प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांना त्यांच्या

pldeshpande१११@gmail.com ईमेल वर कळवावे, असेही शुद्धीपत्रकात म्हटले आहे.






जिल्ह्यात अंमली पदार्थांची निर्मिती होणार नसल्याची दक्षता घ्यावी


पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आवाहन





 

सोलापूर : जिल्ह्यात अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थांची निर्मिती होऊ नये यासाठी कृषीसह अन्य विभागांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिल्या.

पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीत श्रीमती सातपुते बोलत होत्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, केंद्रीय कस्टम विभागाचे सीमा शुल्क अधीक्षक फुलचंद राठोड, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, औषध निरीक्षक सचिन कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हर्षल थडसरे आदी उपस्थित होते.

श्रीमती सातपुते यांनी सांगितले की, आपल्या जिल्ह्यात खसखस आणि गांजाची लागवड होऊ नये, याबाबत कृषी विभागाने दक्षता घ्यावी. जिल्ह्यामध्ये गांजाची लागवड होत आहे, ती रोखणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या कृषी सहायकाने पीक नोंदीची माहिती घेताना काही आढळले तर पोलीस विभागाला कळवावे, या कामात हयगय होता कामा नये.

डॉग स्क्वॉड पथकाने पोस्टाची आणि खाजगी कुरिअरच्या गोडावूनची तपासणी नियमीत करतील. याचबरोबर रेल्वेचे पार्सल गोडावून, शहरातील सर्व कुरिअरची छोटी गोडावून यांची तपासणीही आठवड्यातून करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने रासायनिक कारखाने, 20 साखर कारखान्यामध्ये सुरू असलेल्या को-जनरेशन प्लांटमध्ये अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रत्येक समिती सदस्यांनी तालुका दत्तक घेऊन अंमली पदार्थांचे सेवन केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती शाळा, महाविद्यालय याठिकाणी द्यावी. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, चुका केल्या तर काय होईल, गुन्हे दाखल होऊन करिअरवर परिणाम होईल, हे पटवून देण्याचे आवाहन श्रीमती सातपुते यांनी केले.




गणेशोत्सव काळात मिरवणूक, जमावाबाबत पोलीसांना

सक्षम प्राधिकारी म्हणून अधिकार



महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये आदेश

 

सोलापूर : यावर्षी 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत गणेशोत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. ग्रामीण (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) भागात गणेशोत्सव काळात मिरवणूक, जमावाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणून संबंधित पोलीस अंमलदार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बहाल करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतला आहे. पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये खालीलप्रमाणे आदेश प्रारित केले आहेत.

 

दि.३१ ऑगस्ट २०२२ रोजीचे ००.०० वा. पासून ते दि. ०९ सप्टेंबर २०२२ रोजीचे २४.०० वा. पर्यंत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेस स्वाधिन असलेले अधिकारी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ मधील पोट कलम ‘अ’ ते ‘फ’ प्रमाणे खालील बाबतीत लेखी किंवा तोंडी आदेश देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.


पोलीस अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे अधिकार 


रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणूकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्याची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणूका ह्या कोणत्या मार्गानी व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे. मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेचे वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. या सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाटात किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालये आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्य वाजविण्याचे आणि शंख व इतर कर्कश वाद्य वाजविण्याचे विनियमन करणे त्यावर नियंत्रण करणे. कित्येक वेळा मशिदीत प्रार्थना चाललेली असते त्यावेळी वाद्य वाजविण्यास बंदी घातलेली असते. ही बंदी त्या समाजाच्या धार्मिक भावना दुखवू नये म्हणून घातलेली असते, म्हणजे शांततेसाठी ती घातलेली असते.

कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या ( लाऊड स्पिकर ) उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कर्कश लाऊड स्पिकर लावून लोकांना उपद्रव होण्याची शक्यता असते. त्याकरीता असे नियमन करणे आवश्यक असते. सक्षम प्राधिकाऱ्याने ह्या अधिनियमाची कलमे ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.

याबाबत कोणत्याही इसमाने सदरचा आदेश लागू असेपर्यंत जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्द वगळून) मिरवणूका, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत ठाणेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठाकडून तारीख व वेळासंबंधी, सभेची जागा, मिरवणूका मार्ग, मोर्चे मार्ग त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणांचा अंतर्भाव निश्चित केल्याशिवाय आयोजित करू नये. तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. जाहीर सभा, मिरवणूका, मोर्चे, पदयात्रेत समायोचित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांततेस व सुव्यवस्थेस बाधा होवू शकते, अशा घोषणा देवू नये, असेही श्रीमती सातपुते यांनी आदेशात म्हटले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चक्क गोव्याची दारु वाखरीत......

गुरसाळे बंधारेत सापडला तरुणाचा मृतदेह

सांगोला तालुक्यातील वाळू माफियांवर पंढरपूर पोलीसांची कारवाई